आचारसंहिता लागल्यानंतर आता लाडक्या बहि‍णींना दिवाळीत पैसे मिळणार की नाही? जाणून घ्या

आचारसंहिता लागल्यानंतर आता लाडक्या बहि‍णींना दिवाळीत पैसे मिळणार की नाही? जाणून घ्या

राज्य सरकारने महिलांसाठी सुरु केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आलीय. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये प्रमाणे पाच महिन्याचे ७५०० रुपये जमा करण्यात आले आहे. आता महत्वाचे म्हणेज राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व पक्षांवर काही निर्बंध लावले जातात. त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होते.

त्यात आता लाडक्या बहि‍णींना दिवाळीत पैसे मिळणार की नाही अशी चर्चा आहे. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर होती. तोपर्यंत अनेक महिलांनी फॉर्म भरला आहे. आता या महिलांना अद्याप पैसे आलेले नाहीत. त्यामुळे पैसे पुढे येणार की नाही असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे.

सध्या ऑक्टोबर महिना सुरू आहे. याच महिन्याच्या शेवटी २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. दिवाळीला सुरुवात होत असल्याने पुढच्या महिन्यात भाऊबीज सुद्धा आहे. त्यामुळे भाऊबीजनिमित्त या योजनेतून प्रत्येक बहिणीला भाऊबीज मिळणार होती. मात्र आता आचारसंहिता लागल्याने सरकारकडून या योजनेचे पैसे दिल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही पक्षाला जनतेला पैसे वाटप, योजनांचा लाभ देणे अशा काही गोष्टींवर निर्बंध असतो. त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा झाल्यास महायुतीला कारवाईचा सामना कारावा लागू शकतो.

त्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत ज्या महिलांना योजनेचा फॉर्म भरला त्यांना राज्य सरकारने दिवाळीआधीच दोन महिन्याचे पैसे एकत्र दिलेत. यावरच आता राज्य निवडणूक आयोगाने मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी म्हटलं की “आचारसंहिता लागू झाल्यावर योजना राबविण्यात आली का? निधी देण्यात आला का ? यावर आम्ही तपास करु.” असं त्यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणूक केव्हा?
महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होणार असून याची तारीख २० नोव्हेंबर आहे. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत ही माहिती दिली आहे.

Leave a comment