Ladaki bahin nidhi : महायुती सरकारनं आता लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता वाटपास सुरूवात केली असून राज्यातील नव्या १२ लाख ८७ हजार लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थीच्या खात्यात डिसेंबरपर्यंतची रक्कम जमा केली आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडकी बहिण योजनेनं महायुतीला पुन्हा सत्तेच दारं खुली करून दिली. त्यामुळे या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप झडत होते. परंतु राज्य सरकारने या योजनेचा डिसेंबरची रक्कम वाटपास मंगळवारपासून सुरुवात केली आहे. एकूण ६७ लाख महिलांच्या खात्यात मंगळवारी रक्कम जमा करण्यात आली आहे.
राज्यातील २ कोटी ३४ लाख महिला लाडकी बहिण योजनेस पात्र आहेत. त्यापैकी ६७ लाख महिलांच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित लाभार्थी महिलांना येत्या एक दोन दिवसांत रक्कम जमा करण्यात येईल, असंही मंत्री तटकरे यांनी सांगितलं आहे. Ladaki bahin nidhi
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची सुरुवात केली. या योजनेतून महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये देण्यात आले. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वीच या योजनेचे नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते जमा करण्यात आले होते. या योजनेला सुरुवातीला २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले. त्यापैकी मात्र २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. तर १२ लाख ८७ हजार महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यात आली नव्हती. त्यामुळे या महिलांना लाभ मिळाला नव्हता.
दरम्यान अलीकडेच विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात लाडकी बहिण योजनेसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. विधीमंडळाचं अधिवेशन संपताच रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. Ladaki bahin nidhi