महाडीबीटी योजने अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन अनुदान वाढले आहे. ठिबक व तुषार सिंचन संचासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते याची माहिती तर बहुधा प्रत्येक शेतकऱ्यालाच असेल. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी अनेक शेतकरी बांधव तुषार व ठिबक संच खरेदी करू इच्छित आहेत. लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करा.
ठिबक तुषार सिंचन अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे देण्याचा निर्णय.
पूर्वी म्हणजेच २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना ५५ टक्के व इतर शेतकरी बांधवांना ४५ टक्के अनुदान ठिबक व तुषार सिंचनासाठी मिळत होते आणि जमीन धारण मर्यादा जास्तीत जास्त ५ हेक्टर एवढी होती.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान मिळणार आहे म्हणजेच हे अनुदान ८० टक्के असणार आहे.
इतर शेतकरी बांधवांना ४५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान मिळणार आहे म्हणजेच हे अनुदान एकूण ७५ टक्के एवढे असणार आहे आणि ह्या अनुदानासाठी कमाल ५ हेक्टर क्षेत्र मर्यादा असणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
ठिबक व तुषार सिंचन अनुदान कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली येणार.
कमी पाण्यामध्ये जास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने हे अनुदान दिले जाते. अनेक शेतकरी बांधवांच्या जमिनी ह्या खडकाळ भागात आहेत. अशावेळी त्यांच्या विहिरींना किंवा बोअरवेला कमी पाणी असण्याची शक्यता असते. ठिबक व तुषार संचाचा उपयोग करून कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेता येवू शकते.
कमी पाण्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये तुषार व ठिबक सिंचन अनुदानासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी या वेबपोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज केल्यानंतर मग शेतकऱ्यांना तुषार व ठिबक सिंचन संचासाठी अनुदान दिले जाते. अनेक शेतकरी बांधवाना हा ऑनलाईन अर्ज कसा करावा हे माहित नसते. हि अर्ज प्रक्रिया कशी असते हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
असा करा ऑनलाइन अर्ज.
- तुमच्या कॉम्प्युटरच्या वेबब्राउजरमध्ये टाईप करा Mahadbt farmer login,
- महाडीबीटीची शेतकरी वेबसाईट तुमच्या कॉम्प्युटरवर ओपन होईल.
- तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड असेल तर तो वापरून लॉगीन करा किंवा तुमची नोंदणी करून घ्या आणि युजर आयडी आणि पासवर्ड मिळवा.
- लॉगीन केल्यानंतर अर्ज करा अशी एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील त्यापैकी सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.
- सिंचन साधने व सुविधा असा एक फॉर्म तुमच्या स्क्रीनवर दिसेल या ठिकाणी योग्य माहिती भरा.
- जतन करा या बटनावर क्लिक करा.
- पहा या बटनावर क्लिक करा.
- अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
- जेवढ्या योजनांसाठी अर्ज केला असेल त्या योजनांना प्राधान्य द्या.
- पेमेंट करा या बटनाला टच करा.
अनुदानासाठी ऑनलाईन पेमेंट करण्याची पद्धत.
- पेमेंट करण्यासाठी योग्य ती पद्धत निवडा.
- डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, क्यू आर कोड स्कॉनिंग आणि upi असे पर्याय दिसतील यापैकी एक पर्याय वापरून तुम्ही पेमेंट करू शकता.
- पेमेंट करत असतांना कृपया पेजला रिफ्रेश करू नये.
- यशस्वीपणे पेमेंट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या.