Soybean Rate सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट हेक्टरी १० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी केली आहे
या मागणीबाबत त्यांनी रिसोड येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुरुवातीला शेतकरी नेते (कै.) शरद जोशी आणि लोकनेते गोपीनाथ मुंढे यांना आदरांजली वाहण्यात आली. सोयाबीन उत्पादक शेतकरी पडलेल्या भावामुळे प्रचंड अडचणीत आला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने हेक्टरी १० हजार रुपयांची सरसकट मदत द्यावी.
यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्य सरकारला निवेदन दिले आहे. राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे रविवार (ता. १५)पासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या एक लाख सह्या घेण्याची मोहीम भूमिपुत्र संघटनेकडून राबवली जाणार आहे. Soybean Rate
पहिली सही आपण स्वतःच्या रक्ताने करणार असल्याचे या वेळी श्री. भुतेकर म्हणाले. आकांक्षित (मागास) असणाऱ्या वाशीम जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी व कापूस उत्पादक शेतकरी पडलेल्या भावांमुळे देशोधडीला लागला आहे. राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत न केल्यास भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक बजेट सोयाबीन भावामुळे कोलमडणार आहे. राज्य सरकारने भावांतर योजनेच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. भविष्यात पीककर्ज भरण्यापासून तर खरिपाच्या पेरणीत सुद्धा अडचणी या सोयाबीन उत्पादकांना येऊ शकतात. Soybean Rate
त्यामुळे राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करावी, यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे. जोपर्यंत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत आंदोलने सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला बाजार समितीचे संचालक रवींद्र चोपडे, भूमिपुत्र तालुका समन्वयक महादेव पातळे यांचीही उपस्थिती होती.