Crop Damage Compensation यंदाच्या (२०२४) जुलै आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीकनुकसानीपोटी हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ४ हजार ४८६ बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ४२४ कोटी ४ लाख ६० हजार रुपये तर, जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकनुकसानीपोटी परभणी जिल्ह्यातील १० हजार ९९१ बाधित शेतकऱ्यांना १० कोटी ८ लाख ७१ हजार रुपये निधी वितरणास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात जुलै महिन्यात ७ हजार ७०७ शेतकऱ्यांचे ३ हजार ३४३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले होते. बाधितांच्या मदतीसाठी २३ सप्टेंबर रोजी ४ कोटी ५६ लाख रुपये निधीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता.
सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे २ लाख ९६ हजार ७७९ शेतकऱ्यांच्या २ लाख ९५ हजार १७१ हेक्टरवरील जिरायती, बागायती, फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने बाधितांच्या मदतीसाठी ४९१ कोटी ४८ लाख २१ हजार ३०६ रुपये मागणीचा प्रस्ताव ७ ऑक्टोबर रोजी, तर मागणीचा शासनास सादर करण्यात आला होता. परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे निधी वितरणास मंजुरी मिळाली नव्हती. Crop Damage Compensation
परभणी जिल्ह्यासाठी जुलैमधील १० कोटीवर निधी मंजूर
परभणी जिल्ह्यात जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे १० हजार ९९१ शेतकऱ्यांचे ७ हजार ४१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.बाधितांच्या मदतीसाठी १० कोटी ८ लाख ७१ हजार रुपये निधीची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी सप्टेंबरमधील परभणी जिल्ह्यासाठी ५४८ कोटी ५९ लाख ८९ हजार निधी मंजूर झाला आहे. Crop Damage Compensation
ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप सुरू झाले आहे. जुलैमधील बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तलाठ्यांमार्फत केल्या जातील. त्यानंतर विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर अर्थसाह्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
हिंगोली जिल्हा सप्टेंबर अतिवृष्टी मदत
मंजूर निधी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)
तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र मंजूर निधी
हिंगोली ५२६५० ५८७६६ ८१ कोटी ४४ लाख रुपये
कळमनुरी ५९०१३ ६०६१९ ८५ कोटी ९२ लाख रुपये
वसमत ७५२६२ ६२१८९ ८९ कोटी ६५ लाख रुपये
औंढानागनाथ ४९९२८ ४८६६० ६९कोटी १४ लाख रुपये
सेनगाव ५९९२९ ६४९३५ ९३ कोटी ३१ लाख रुपये